बडबड गीते

: असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
"हॅलो, हॅलो !" करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर


नाच रे मोरा, अंब्याच्या बनात
नाच रे मोरा, अंब्याच्या बनात
नाच रे मोरा नाच !
ढगांशि वारा झुंजला रे
काळाकाळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !
झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच !
थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !
पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझिमाझि जोडी जमली रे
आभाळात छान छान, सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच !
कवी : ग. दि. माडगूळक


: ए आई मला पावसात जाउ दे
ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे
मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभातुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे
बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुक दादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे
धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे
कवियत्री : वंदना विटणकर


एक होता काऊ
एक होता काऊ, तो चिमणीला म्हणाला
"मला घाल न्हाऊ, घाल न्हाऊ, घाल न्हाऊ"
एक होता पोपट, तो चिमणीला म्हणाला
"तू मला थोपट, तू मला थोपट, तू मला थोपट"
एक होती घूस, ती चिमणीला म्हणाली
"तू माझे अंग पूस, तू माझे अंग पूस, तू माझे अंग पूस"
एक होती गाय, तिने चिमणीला विचारले
"तुझे नाव काय, तुझे नाव काय, तुझे नाव काय ?"
एक होते कासव, ते चिमणीला म्हणाले
"मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव"
कवी : मंगेश पाडगावकर


: चांदोबा चांदोबा भागलास का ?
चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !
आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न् शेवया खाशील का ?
आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला 'ओ' माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?
कवी : ग. दि. माडगुळकर



झुक झुक झुक झुक अगीनगाडी
झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन घेऊया
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया
मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया
मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया
कवी : ग. दि. माडगूळकर



शाळा सुटली, पाटी फुटली
शाळा सुटली, पाटी फुटली
आई, मला भूक लागली
शाळा सुटता धावत सुटले
ठेच लागुनी मी धडपडले
आई मजला नंतर कळले
नवीन कोरी पाटी फुटली
धम्मक लाडू चापट पोळी
नको देउ मज हवीच गोळी
किंवा दे ग, खमंग चकली
दे ना लवकर, भूक लागली
सायंकाळी जाउ दे मला
पटांगणावर खेळायाला
तिथे सोबती वाट पाहती
दे ना खाऊ, भूक लागली
कवी : योगेश्वर अभ्यंकर



 तो ससा की कापूस जसा
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
ससा तो ससा की कापूस जसा
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली
चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहियले
वाटेत थांबले ना कोणाशी बोलले ना
चालले लुटुलुटु पाही ससा
हिरवीहिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा, घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे, गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे ससा
झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळला मनी होई
"निजला तो संपला" सांगे ससा
कवी : शांताराम नांदगावकर



 गोरी गोरीपान फुलासारखी
गोरी गोरीपान, फुलासारखी छान
दादा, मला एक वहिनी आण ।।धृ।। दादा, मला एक...
गोर्या गोर्या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण ।।१।। दादा, मला एक...
वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान ।।२।। दादा, मला एक...
वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्यापरी होऊ दोघी आम्ही सान ।।३।। दादा, मला एक...



घड्याळ दादा
घड्याळ दादा -- घड्याळ दादा --जरा थांब थांब !
सारखी कीट -कीट का करतोस खर-खर सांग !
तुझा एक हात आहे खूप -खूप मोठा
मिनटा-मिनटाला टोचे वेळेचा काटा
तुझा दुसरा हात आहे छोटा छोटा
पण तासाची गणिते करतो पटा -पटा
मोजतोस तू फक्त एक-ते - बारा आहेस ढ गोळा !
आमच्या आळसावर मात्र सतत तुझा डोळा !
हसतोस फक्त गोड-गोड बसून भिंतीवर !
सारे जग मात्र चाले तुझ्या तालावर !



उठा उठा चिऊताई
उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही ।।धृ।।
सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही ।।१।।
लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे ।।२।।
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या ।।३।।
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूर भूर भूर भूर ।।४।।



उंदीरमामा आणि मनीमावशी -
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग
ऐकू आली फोनची रिंग -
कुणीच नाही फोनपाशी
उंदीरमामा बिळापाशी !
उंदीरमामा हसले मिशीत ,
टेबलावरती चढले खुषीत -
फोन लावला कानाला
जोरात लागले बोलायला -
" उंदीरमामा मी इकडे ;
कोण बोलतय हो तिकडे ? "
- विचारले मामानी झटकन
उत्तर आले की पटकन-
" मी तुमची मनीमावशी,
कालपासून आहे उपाशी ."
- मनीमावशी भलती हुषार ,
टुणकन मामा बिळात पसार !!

No comments:

Post a Comment