नाम

नाम व्याकरण
खालील सर्व शब्दांना व्याकरणान नाम म्हणतात.
जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम म्हणतात.
मुलांची नवे : राजेश कुमार यज्ञेश
मुलींची नावे : संगीता शीतल कुसुम
पक्ष्यांची नावे : मोर चिमणी पोपट
प्राण्यांची नावे : हत्ती चिता सिंह
फुलांची नावे : झेंडू मोगरा गुलाब
फळांची नावे : पपई पेरू आंबा
भाज्यांची नावे : भोपळा भेंडी कोबी
वस्तूंची नावे : फळा खुर्ची टेबल
पदार्थांची नावे : चकली चिवडा लाडू
नद्यांची नावे : गोदावरी यमुना गंगा
पर्वतांची नावे : सातपुडा सह्याद्री हिमालय
अवयवांची नावे : नाक कान डोळा
नात्यांची नावे : आई बहीण भाऊ
काल्पनिक नावे : परी राक्षस देवदूत
गुणांची नावे : महानता नम्रता शौर्य
मनःस्थितीची नावे : उदास दुःख आनंद
(माणसे, वस्तू, पदार्थ, प्राणी, पक्षी, त्यांचे गुण, काल्पनिक वस्तू यांना जी नावे ठेवली आहेत, त्यांना नाम म्हणतात.)
नामांचे प्रकार
१) सामान्यनाम २) विशेषनाम ३) भाववाचकनाम
१) सामान्यनाम :
वाक्ये वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या :
१) ओजस्वी हुशार मुलगी आहे.
२) गंगा पवित्र नदी आहे.
३) मुंबई प्रसिद्ध शहर आहे.
वरील वाक्यांतील -
१) 'मुलगी' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही मुलीला लागू पडतो.
२) 'नदी' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही नदीला लागू पडतो.
३) 'शहर' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही शहराला लागू पडतो.
अशा प्रकारे 'मुलगी, नदी, शहर' ही नावे अशी आहेत की, ती त्या त्या जातीतील सर्व वस्तूंना, त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मांमुळे लागू पडतात.
ही नामे जातीवाचक , म्हणजेच विशिष्ट गटातील आहेत. जातीवाचक नामांना व्याकरणात सामान्यनाम
म्हणतात; म्हणून मुलगा, नदी, शहर ही सामान्यमाने
आहेत.
(एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुंणधर्मांमुळे जे नाव दिले जाते, त्याला सामान्यनाम म्हणतात. उदा. मुलगा, नदी, शहर, घर, फूल, पुस्तक, चित्र, कपाट, टोपी इत्यादी .......)
२) विशेषनाम :
पुन्हा तीच वाक्ये वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या :
१) ओजस्वी हुशार मुलगी आहे.
२) गंगा पवित्र नदी आहे.
३) मुंबई प्रसिद्ध शहर आहे.
वरील वाक्यांतील -
१) 'ओजस्वी' हा शब्द एकाच मुलीला लागू पडतो.
२) 'गंगा' हा शब्द एकाच नदीला लागू पडतो.
३) 'मुंबई' हा शब्द एकाच शहराला लागू पडतो.
अशा प्रकारे 'ओजस्वी, गंगा, मुंबई' ही नावे अशी आहेत की, ती त्या त्या जातीतील एका विशिष्ट
वस्तूला किंवा व्यक्तीला लागू पडतात.
ही नामे व्यक्तिवाचक आहेत. व्यक्तिवाचक नामांना व्याकरणात विशेषनाम म्हणतात, म्हणून ओजस्वी, गंगा, मुंबई ही विशेषनामे आहेत.
(ज्या नामाने जातीचा बोध होत नसून, त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो, त्याला विशेषनाम म्हणतात. उदा. - संतोष, सुमित, सुनंदा, मुंबई, भारत, गंगा, नागपूर इत्यादी.......)
३) भाववाचकनाम :
वाक्ये वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या :
१) ओजस्वीची हुशारी सर्वांना माहीत आहे.
२) गंगाचे पावित्र्य मनात ठसवा.
३) मुंबई शहरात संपन्नता आहे.
वरील वाक्यांतील -
१) 'हुशारी' हा शब्द ओजस्वीचा गुण दाखवतो.
२) 'पावित्र्य' हा शब्द गंगा नदीचा गुण दाखवतो.
३) 'संपन्नता' हा शब्द मुंबई शहराचा गुण दाखवतो.
अशा प्रकारे 'हुशारी, पावित्र्य, संपन्नता' ही नावे वस्तूंमधील किंवा व्यक्तींमधील गुणांची नावे आहेत.
ही नामे वास्तुमधील गुण किंवा धर्म किंवा भाव दाखवतात. अशा नामांना व्याकरणात भाववाचकनाम म्हणतात; म्हणून हुशारी, पावित्र्य, संपन्नता ही
भाववाचकनामे आहेत.
(ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यामधील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो, त्याला भाववाचकनाम
म्हणतात. उदा. पावित्र्य, संपन्नता, चांगुलपणा, सौंदर्य, मोठेपणा, नम्रता, लबाडी, चपळाई इत्यादी.......)

No comments:

Post a Comment